
गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफ ईस्ट कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आमरण उपोषण करण्याचा कामगारांचा निर्धार
गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफ ईस्टकंपनी प्रा. लि. येथील तब्बल २४० कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ कामगार वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आवाज उठवत दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
कामगारांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ते सर्व खडपोली, गाणे, वालोटी, कळकवणे, तसेच आसपासच्या गावांतील रहिवासी असून काहीजणांनी या कंपनीत तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे. मात्र, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कामगारांना कामावरून कमी केले.
या पार्श्वभूमीवर दि. २७ सप्टेंबर रोजी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन, प्रशासकीय अधिकारी व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत व्यवस्थापनाच्यावतीने श्री. आंबेकर यांनी आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीने “कामगारांना टप्याटप्याने पुन्हा कामावर घेतले जाईल” असे आश्वासन दिले होते.
परंतु प्रत्यक्षात केवळ १३० कामगारांनाच कामावर घेतले गेले, तर उर्वरित कामगारांना आजतागायत कामावर घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर कामावर परतलेल्या कामगारांनाही अपमानकारक वागणूक दिली जात असून दोन कामगारांचे काम एका व्यक्तीकडून करवून घेतले जात आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.कामगारांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कंपनी व्यवस्थापनाने “कच्चा मालाचा तुटवडा असल्याचे खोटे कारण देऊन कामगारांना कमी केले आणि बाहेरील व्यक्तींना कामावर घेतले.” यामुळे स्थानिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून सणासुदीच्या काळात त्यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत.
या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व कामगारांनी दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या कुटुंबीयांसह कंपनीसमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.




