आदित्य ठाकरे यांनी दापोलीतून विधानसभा लढवावी ः माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी टाकली गुगली

रत्नागिरी ः दापोली विधानसभा मतदारसंघातून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी मातोश्रीकडे एका पत्राद्वारे केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. ही मागणी म्हणजे दळवी यांनी ना. रामदास कदम यांच्यासाठी टाकलेली गुगली असल्याचे बोलले जात आहे.

दळवी यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले असून दापोली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत सुरक्षित मतदार संघ आहे. आपण या मतदारसंघात १९९० पासून २०१४ पर्यंत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे २०१९ च्या विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सूक आहेत. त्यामुळे त्यांनी या भागातून निवडणूक लढविल्यास दापोलीसारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेश जाईल. कोकणचे व ठाकरे कुटुंबियांचे असलेले भावनिक नाते त्यामुळे अधिक बळकट होईल. या मतदारसंघात जे अन्य पक्षाचे उमेदवार आहेत ते पूर्वी शिवसेनेत असल्याने आपण आदित्य ठाकरे यांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू असेही दळवी यांनी विश्‍वास व्यक्त केला आहे. दळवी यांनी मातोश्रीला पाठविलेले हे पत्र म्हणजे एक प्रकारे पर्यावरणमंत्री ना. रामदासभाई कदम यांच्यासाठी टाकलेली गुगली असल्याचे कळते. या मतदारसंघातून रामदासभाई यांचे सुपुत्र योगेश कदम हे निवडणूक लढविण्यास उत्सूक असून तशी त्यांनी तयारीही केली आहे. यामुळे दळवी यांच्या गुगलीवर कदम हे त्रिफळाचित होणार की कसे? हे आता मातोश्रीच्या निर्णयावर अवलंबून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button