
आरक्षित डबा न जोडताच धावली कोकण रेल्वे;
कोकण रेल्वेचा निष्काळजीपणा एका धक्कादायक घटनेमुळे उघडकीस आला आहे. एक्सप्रेसमध्ये असलेला आरक्षित डबा न जोडताच रेल्वे स्थानकावरुन धावली यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आरक्षित प्रवाशांना अखेर इतर डब्यात उभं राहून प्रवास करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.मुंबई ते मडगाव जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. एक्सप्रेसमधील डिएल-०१ डबा आरक्षित होता. यात अनेक प्रवाशांनी बुक केलेल्या तिकीटांच्या कन्फर्म सीट होत्या. पण, ऐनवेळी एक्सप्रेसमध्ये आरक्षित डबा जोडलाच नसल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांची धावपळ झाली. अखेर या प्रवाशांना इतर डब्यातून उभं राहून प्रवास करावा लागला.रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे प्रवासी चांगलेच संतापले. संतप्त प्रवाशांनी तिकीट तपासणीस आणि अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. झालेल्या गैरसोयीचे कथन केले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करावी, असा सल्ला दिला. घडलेला प्रकार संतापजनक असल्याचे म्हणत प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.




