
सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा, वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने चिपळूण मध्ये एकाची एक लाख 15 हजार ची फसवणूक
सायबर गुन्हेगारी बाबत वारंवार आवाहन करूनही सायबर गुन्हेगार नवीन नवीन फंडे वापरत असल्याने अनेक जणांची अजूनही फसवणूक होत आहे असाच प्रकार चिपळूण शहरात घडला आहे
चिपळूण शहरात एका निवृत्त अधिकाऱ्याला मोठा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या मित्राचा आवाज वापरून वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने तब्बल १ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
या प्रकरणी अरुण पुरुषोत्तम बापट (वय ६८, व्यवसाय: सेवानिवृत्त, रा. शिवाजी नगर, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही फसवणुकीची घटना नुकतीच ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.१५ ते दुपारी १२.०० च्या दरम्यान शिवाजी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. फिर्यादी अरुण बापट यांना ८५७२८७५२५५ या क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने बापट यांच्या एका जुन्या मित्राचा आवाज वापरून बोलण्यास सुरुवात केली. त्याने बापट यांना सांगितले की, तो वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या (बापट यांच्या) खात्यावर काही रक्कम पाठवत आहे. यावर विश्वास बसल्यानंतर, त्याने बापट यांना ‘पैसे परत पाठवा’ अशी मागणी केली.
मित्राच्या आवाजावर विश्वास ठेवून आणि त्याला मदत करण्याच्या उद्देशाने बापट यांनी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन व्यवहार केले. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात सायबर चोरट्याने त्यांच्या खात्यातून १,१५,०००/- (एक लाख पंधरा हजार रुपये) इतकी मोठी रक्कम काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.
या गंभीर आर्थिक फसवणुकीची तक्रार अरुण बापट यांनी तत्काळ ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.३१ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.



