
रायपाटण येथील वृध्द महिलेच्या मृत्युप्रकरणी अज्ञाताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल…
राजापूर : तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथील ७४ वर्षीय महिला श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या मृत्यू प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गेले दोन दिवस पोलिसांकडून जोरदार तपास सुरू होता.
दरम्यान, मयत वैशाली शेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रायपाटण टक्केवाडी येथील श्रीमती वैशाली शेटे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव हे गुरुवारी रायपाटण येथे तपासकामी उपस्थित होते. तपासात विविध बाबींची पडताळणी केली जात आहे. फॉरेन्सिक लॅब टीम देखील गुरुवारी रायपाटणमध्ये दाखल झाली होती.
मयत श्रीमती वैशाली शेटे यांच्या डोक्यावर जखम आढळून आली, तर शरीर काळे पडले होते. त्यांच्या कानातील रिंगा कानातच होत्या; मात्र अंगावरील सोन्याची चेन मात्र गायब होती. दरम्यान राजापूर पोलिसांनी त्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत श्रीमती वैशाली शेटे यांचा मृतदेह शवाविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर रायपाटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.




