
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीचे अर्ज भरण्यास २७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज युडायस प्लसवरून ऑनलाईन पध्दतीने माध्यमिक शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत.
पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन बसणारे, तसेच औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येणार आहेत.
माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाईलमध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षकांबाबत योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठवावी. विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन सबमीट केल्यानंतर शाळांच्या लॉगिन मध्ये प्री- लिस्ट उपलब्ध होईल. शाळांनी प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. त्यावर विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापकांना प्री -लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी लागणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी दिली.




