
क्षत्रिय मराठा मंडळाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा रंगला
स्वतःचे सोशल स्टेट्स घडवा- डॉ. अमित बागवे रत्नागिरीत पर्यटन व्यवसायाला संधी एआयसोबत काम करायला शिका



रत्नागिरी : सोशल मीडियावर दुसऱ्यांचे स्टेट्स बघण्याऐवजी स्वतःचे सोशल स्टेट्स घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही कर्म करत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, त्यासाठी पाऊल उचलावे लागेल, कष्ट सोसावे लागतील. बदललेल्या जगासोबत जुळवून घ्यावे लागेल, कोकणात, रत्नागिरीत पर्यटन चांगले चालते, पण आपण व्यवसाय म्हणून बघत नाही, सेवा मिळते का, आदरातिथ्य होतंय का, याचा विचार करा व या उद्योगात पाऊल टाका, असे प्रतिपादन बिझनेस काउन्सेलर, उद्योजक, तज्ज्ञ व्याख्याते डॉ. अमित बागवे केले.
क्षत्रिय मराठा मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा रविवारी सायंकाळी अंबर हॉल येथे साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. बागवे बोलत होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, सरचिटणीस योगेश साळवी, सल्लागार सतीश साळवी, प्रचार प्रमुख संतोष तावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, सल्लागार नंदकुमार साळवी आदी उपस्थित होते.
उद्योगावर सविस्तर मार्गदर्शन
डॉ. बागवे यांनी तरूण पिढी, उद्योग व्यवसाय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणूक यावरही मार्गदर्शन केले. मराठी उद्योजकांचे ब्रँड पुढे आणत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, मराठ्यांना आरक्षण मिळेल, पण राज्यात आपण ४० टक्के आहोत, पण प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही. सध्या कंत्राटी कामगार वाढलेत. त्यामुळे ४ कोटी समाजाला हा फायदा मिळेल का? काही जण पुढे जातील, बाकीच्यांनी व्यवसायात आले पाहिजे. मराठा म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आले पाहिजे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करा. एआयमुळे नोकऱ्या जाणार आहेत, पण तुम्ही शिकून घेतले, तर तुम्ही पुढे जाल. जागतिक मराठा समाज संघटना काढूया. त्यासाठी अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांच्यासारख्यांनी मदत करावी. अन्य समाजाच्या सुद्धा अशा संस्था आहेत.
मंडळाचे काम जोमाने
अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे म्हणाले की, क्षत्रिय मराठा मंडळाचे १८ वर्षे काम जोमाने सुरू आहे. अखिल मराठा संमेलन रत्नागिरीत उत्साहात झाले. मराठा भवन आणि श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उभे करण्याचे स्वप्न पाहिले असून ते लवकर होईल. त्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे.
प्रास्ताविक करताना प्राची शिंदे यांनी सांगितले की, एकत्र येणे हे आजच्या पिढीला आवश्यक आहे. तुम्ही आलात तर मुलांवर संस्कार होणार आहेत. मंडळाची स्थापना एकत्र येण्यासाठी, संस्कारासाठीच झाली. वर्षभर मंडळ विविध कार्यक्रम करते. यामध्ये वधू वर मेळावा, महिलांसाठी हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, दहावी बारावी गुणवंतांचा सत्कार केला जातो. अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरीत यशस्वी करण्यात मंडळाचा सिंहाचा वाटा होता. मराठा बंधू-भगिनींनी मंडळाला फक्त आर्थिक नव्हे तर वेळ देऊन सहकार्य करावे.
याप्रसंगी कार्याध्यक्ष राकेश नलावडे आणि प्रचार प्रमुख संतोष तावडे यांनीही मनोगत व्यक्त करताना मराठा मंडळींनी एकत्र राहिले पाहिजे व आपले व्यवसाय उद्योग वाढवले पाहिजेत असे स्पष्ट सांगितले.
कार्यक्रमात सीईटी, नीट, जेईई या परीक्षेमधील गुणवंत, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक आणि एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. मराठा समाजातील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरीकांना सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमही रंगले. लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सायकल, ओव्हन आणि अन्य विविध बक्षिसांचा समावेश होता. वर्धापनदिनानिमित्त कुलस्वामिनी माता श्री तुळजाभवानीची पूजा करण्यात आली. संध्या नाईक यांनी गणेश वंदना सादर केली. सूत्रसंचालन अमित कदम यांनी ओघवत्या शैलीत व सुरेखरित्या केले. कौस्तुभ सावंत यांनी आभार मानले.




