
१०० संवादिनीवादक आज देणार पं. गोविंदरावांना मानवंदना
पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ यांच्या वतीने येत्या २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जाई काजळ प्रस्तुत ‘शतसंवादिनी २.०’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवातीपासूनच प्रचंड प्रतिसाद लाभत असून तिकीट विक्री ऑनलाईन सुरू आहे. प्रयोग ‘हाऊसफुल्ल’च्या दिशेने वाटचाल करत आहे. अगदी मोजकीच तिकिटे शिल्लक असल्याचे आयोजकांनी सांगितले.
गतवर्षी २१ सप्टेंबरला १०० हून अधिक संवादिनीवादकांच्या साथीने सादर झालेल्या जाई काजळ प्रस्तुत शतसंवादिनी कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी त्याचा पुढील भाग म्हणून ‘शतसंवादिनी २.०’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येही १०० पेक्षा अधिक संवादिनी वादक व तालवाद्य साथीदार सहभागी होणार असून, सुप्रसिद्ध नाट्यगीतांवर आधारित हार्मोनियम सिम्फनी सादर होईल.




