
शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा- प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी
रत्नागिरी, दि. 18 ):- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेचे सन २०२४-२५ पर्यंतचे महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन निकाली काढावेत, अशा सूचना प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण बाळासाहेब सोळंकी यांनी दिल्या.
महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत. हे अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त श्री. सोळंकी अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक आज सकाळी ११ वाजता संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदय गायकवाड आणि बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रादेशिक उपायुक्त श्री. सोळंकी यांनी शिक्षण शुल्क समितीने मंजूर केलेल्या सर्व संबंधित अभ्यासक्रमांचे सन २०२५-२६ मधील अर्ज देखील तातडीने निकाली काढावेत, अशा सूचना महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांना दिल्या.




