
मोसमी पावसाला परतीचे वेध, १५ सप्टेंबरपर्यंत माघारीची शक्यता!
मोसमी पावसालाआता परतीचे वेध लागले असून र्नैऋत्य मोसमी पाऊस १५ सप्टेंबरच्या आसपास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी सांगितले.
पश्चिम राजस्थानच्या काही भागातून १५ सप्टेंबरच्या आसपास पावसाची माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे आयएमडीने सांगितले.
मोसमी पाऊस साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश होतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात व्यापतो. तर १७ सप्टेंबरच्या आसपास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेतो.
या वर्षी मान्सूनने ८ जुलै या सामान्य तारखेच्या नऊ दिवस आधी संपूर्ण देश व्यापला होता. संपूर्ण देश व्यापणारा २०२० नंतर हा सर्वात पहिला मान्सून होता. त्या वर्षी मान्सूनने २६ जूनपर्यंत संपूर्ण देश व्यापला होता. यंदा २४ मे रोजी केरळमध्ये पोहोचला, जे २००९ नंतर भारतात त्याचे सर्वात पहिले आगमन होते. २००९ मध्ये, मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.




