
करूळ घाटातील दरड 9 दिवसांनी हटवली; वाहतूक आजपासून पूर्ववत
करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, शनिवार, दि. 13 सप्टेंबरपासून या घाटमार्गातील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी वाहतूक सुरू करण्याबाबत आदेश काढला आहे.त्यामुळे गेले नऊ दिवस बंद असलेली तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत होणार आहे. याबाबत वाहन चालक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
करूळ घाटात 4 सप्टेंबर रोजी गगनबावड्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर यू आकाराच्या वळणावर दरडीचा महाकाय भाग रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पडलेली ही दरड काढत असताना येथे मोठ्या प्रमाणात दरडीला तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या धोकादायक कधीही कोसळतील, असा दरडीचा भाग काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणे धोक्याचे होते. या दरडी काढण्यासाठी पाच-सहा दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचा अहवाल महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला होता. यानुसार करूळ घाटतील वाहतूक 12 सप्टेंबर पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्यांनी दिले होते.




