
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP)
बसविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ
*रत्नागिरी, दि. 22 – 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर 1 डिसेंबर 2025 पासून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ही नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापुढे अशा वाहन मालकांच्या वाहनांची पुननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येतील. वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एचएसआरपी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.




