वीज वितरणाबाबतीत असणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी वाटद जि.प. गटातील सर्व गावांची MSEDCL कंपनीसोबत सभा

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील वीज वितरण (MSEDCL) कंपनीबाबत असणाऱ्या समस्या, तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी संबंधित गावातील सरपंच, कार्यकर्ते यांची एक सभा वाटद -खंडाळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात काल (२२ ऑगस्ट) सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेला वीज वितरण कंपनीचे रत्नागिरी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर, उप कार्यकारी अभियंता रवींद्र आर. मोरे, साईराज नागवेकर, राहुल देशमुख, राजेंद्र पवार, सहायक अभियंता (मजीप्रा) सागर नांदगावकर, शाखा अभियंता के. के. केळस्कर, सुमित पाध्ये, उपअभियंता ए. सी. दाभोळकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या सभेमध्ये अनेक समाजोपयोगी समस्या, तक्रारी उपस्थितांकडून अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. पोल बदलणे, ट्रान्सफॉर्मर्स बदलणे आदी बाबतीत अतिरिक्त कार्यकारी अभियंता (MSEDCL) सुयोग पाटणकर यांनी जागच्या जागी अनेक निर्णय घेतले आणि दोन दिवसांत याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. जांभारी गावचे सरपंच आदेश पावरी व जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांनी लेखी निवेदनेसुद्धा सादर केली. या निवेदनावरसुद्धा तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधितांना देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सभेला वीज वितरणच्या वतीने नेहमीच एक सक्षम कर्मचारी उपस्थित ठेवावा आणि त्या सभांमधून ज्या जनतेच्या, वीज ग्राहकांच्या मागण्या येतील त्याचा आढावा MSEDCL च्या वरिष्ठानी तात्काळ घेवून निर्णय घ्यावा, अशी विशेष मागणी याप्रसंगी जयगड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांनी केली. ही तात्काळ मान्य करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन समस्या मार्गी लावणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे सर्व उपस्थितांनी मनापासून आभार मानले आणि त्यांना धन्यवाद दिले .
या सभेला ग्रामस्थांतर्फे वाटदचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे, जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी, जयगड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शौकत उमर डांगे, साखरमोहल्लाचे माजी सरपंच असलम गुहागरकर, जांभारीचे सरपंच आदेश पावरी, सैतवडेचे सरपंच साजिद शेखासन, वाटदचे माजी सरपंच प्रशांत घोसाळे, विलास बारगुडे, दीपक कुर्टे, बाळकृष्ण पाष्टे, संदीप जाधव, सुरेश तांबटकर, निलेश कुर्टे, रमेश धनावडे, सुरेश ताम्बटकर, संदीप जाधव, दिनेश हळदे, विनायक शिंदे, सुवेश चव्हाण, नामदेव चौगुले (उपविभाग प्रमुख शिवसेना), सुजित दुर्गवळी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, मनोज विचारे, श्रीमती हर्षला वरवडकर, श्रीमती सव्यकीता वासावे आदी प्रमुख ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. आभारप्रदर्शन अनिरुद्ध साळवी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button