
आम्ही कोकणस्थ” कार्यालयाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते उदघाटन
गुहागर मधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट बाजारात आणण्याचा श्री. गुरुदास साळवी यांचा प्रयत्न
गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र श्री गुरुदास मदन साळवी यांनी गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट हमीभाव देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या आम्ही कोकणस्थ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन डॉ.विनय नातू यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गुहागर या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तालुक्यांमध्ये नारळ,सुपारी,आंबा,काजू,कोकम ही पिके प्रामुख्याने घेतली जातात आणि प्रामुख्याने त्यातूनच गुहागरवासियांचे अर्थार्जन होते. मात्र या उत्पादनांना सर्व प्रकारच्या बाजारपेठेमध्ये योग्य तो दर मिळत नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर, या शेतमालाची सुलभ रीतीने विक्री आणि त्याचा खात्रीशीर मोबदला या व्यापक दृष्टिकोने गुरुदास साळवी यांनी या आम्ही कोकणस्थ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड ची स्थापना केली आहे. गुरुदास साळवी यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे पालशेत येथील पालशेतकर माध्यमिक विद्यालय मध्ये झालेले आहे. येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुंबईकडे वळलेले गुरुदास साळवी यांचे मन नोकरीमध्ये रमत नव्हते. भरभक्कम पगार असताना सुद्धा आपला स्वतःचा व्यवसाय हवा या दृष्टिकोनातून त्यांनी मुंबईमध्ये व्यवसाय उभारणीसाठी सुरुवात केली आणि ते यशस्वी झाले. आपल्या व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर आपण ज्या भूमीत जन्मलो,वाढलो त्या भूमीसाठी काही ना काहीतरी करावे या हेतूने आम्ही कोकणस्थ या नावाने गुरुदास आणि त्यांचे सहकारी एकत्र आले आणि त्यांनी या गुहागरमध्ये जी शेतपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात त्यांना राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय बाजारात आणण्याचे पाऊल उचलले आणि या प्रथम वर्षात त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आहे. या गुहागर तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य,धार्मिक, क्रीडा या विविध विषयांमध्ये गेली ५ वर्ष साळवी यांनी आपला ठसा उमटवला आहे. पालशेत गावातील दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय भिमुख करण्यासाठी इलेक्ट्रिकल सायकली मोफत दिल्या आहेत. अशा या उदात्त हेतूने स्थापित झालेल्या कंपनीच्या गुहागर तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार डॉ.विनयजी नातू यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आपल्या गुहागर तालुक्याचा एक सुपुत्र शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याच्या हेतूने प्रेरित होऊन ते काम प्रत्यक्षात करत असल्याचा अभिमान व्यक्त करत तालुका वासियांनी गुरुदासच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचे, त्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य नेत्राताई ठाकूर,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे, पालशेत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र कानिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, पालशेतकर महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश तोडणकर,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, मंगेश रांगळे,सुधाकर वहाळकर,तालुका सरचिटणीस सचिन ओक,माजी मुख्याध्यापक मनोज जोगळेकर,विद्यमान मुख्याध्यापक बालभोटे सर, अनिल साळवी, डॉक्टर साळवी, सचिन तांबे आदिंसह पालशेत गावातील व गुहागर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात आणून त्याला योग्य हमीभाव घेण्यासाठीचे एक दालन श्री गुरुदास साळवी यांनी उघडल्याबद्दल गुहागर तालुक्यातून त्यांचे कौतुक होऊन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.