
ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढूनकृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा
रत्नागिरी, दि. १४ :- शासनामार्फत राज्यात अॕग्रीस्टॅक योजना १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) मिळणार आहे. mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांनी तसेच बाहेरगावी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले प्रलंबित असलेले अॕग्रीस्टॅक योजनेतील नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
सीएस केंद्र आणि कृषि विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांचेशी संपर्क करून ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी.
अकराव्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ४ लाख ८७ हजार ९३६ खातेदार असून सदर योजनेअंतर्गत आजपर्यंत जिल्हयातील एकूण २ लाख ३७ हजार ९७० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण एकूण खातेदारांच्या तुलनेत ४९ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ७०६ शेतकऱ्यांची पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली आहे. सदर अॅक्टिव पी.एम. किसान लाभार्थीपेकी आज अखेर १ लाख ३५ हजार ८४१ लाभार्थीची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झाली असून त्याचे प्रमाण ७८ टक्के आहे.
राज्यात ११ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयान्वये कृषी विषयक योजना पीक विमा, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पी एम किसान योजना इत्यादीचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेमधील लाभार्थी यांना अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. पी.एम. किसान पोर्टलवर नवीन स्वयंनोंदणी करण्यासाठी देखील अॅग्रीस्टॅकमधील फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. अद्यापही पी एम किसान मधील अॅक्टिव लाभार्थीपकी ३६ हजार ८६५ लाभार्थी तसेच एकूण खातेदार पैकी २ लाख ४९ हजार ९६६ खातेदार अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे प्रलंबित आहेत. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) काढणे आवश्यक आहे.




