
दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या उदघाटनाची युद्धपातळीवर तयारी सुरू
येथील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या १६ ऑगस्ट रोजी होणार्या उदघाटनासाठी यंत्रणेने सर्वच आघाड्यांवर कंबर कसली आहे. रस्ते डागडुजीसह दोन हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी जिल्हास्तरावरील सर्वच प्रशासकीय यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी तालुक्यात डेरेदाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जातीने तालुक्यात वरच्या वर भेट देत असून येथील परिस्थिती कामातील प्रगती यांचा आढावा घेत आहेत.
उदघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती लाभणार आहे. यामुळे साध्याच यंत्रणा ’हाय अलर्ट’वर काम करीत आहेत. यानिमित्त तालुक्यात अतिमहत्वाच्या व्यक्ती येणार असल्याने शिरगाव येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. याचबरोबर हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या मुख्य रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मुख्य रस्त्यापासून न्यायालयाच्या इमारतीकडे जाणार्या जोडरस्त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.www.konkantoday.com