
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे 12 ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचे आयोजन
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे 12 ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचे आयोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे 3.30 वाजता खुले केले जाणार आहे. अंगारकी यात्रोत्सवानिमित्त प्रारंभी मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण 18 तासांच्या कालावधीत चंद्रोदयानंतर रात्री 10.30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे.
या अंगारकी चतुर्थीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने स्वयंभू ‘श्रीं’च्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कानाकोपर्यांतून सुमारे 50 ते 60 हजार भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात असून, येणार्या भाविकांना पावसाची शक्यता लक्षात घेऊन दर्शनाची सोय सुलभ व्हावी, याकरिता संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने मंदिर परिसरात दर्शन रांगा उभारून त्यावर खास पत्रे टाकून मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्वल्यास खास आरोग्य सेवेसाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच समुद्र किनार्यावर कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि अन्य यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. तसेच मंदिर आणि संपूर्ण गणपतीपुळे परिसरात भाविकांच्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण व चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याचे आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे पोलिस कर्मचारी आपली विशेष गस्त ठेवणार आहेत.
यात्रोत्सवामित्ताने घाटमाथ्यावरील विविध ठिकाणचे दुकानदार दोन दिवस अगोदरच दाखल झाले असून त्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच या निमित्ताने घाटमाथ्यावरील काही गणेश मंडळे देखील भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यासाठी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.