धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेची हत्या; जयेश गोंधळेकरचा साथीदार गणेश कांबळे अद्याप फरार


चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील ६८ वर्षीय निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खून प्रकरणाचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत करत चिपळूण पोलिसांनी ४६ वर्षीय जयेश भालचंद्र गोंधळेकर याला अटक केली आहे. पैशांसाठी आणि दागिन्यांच्या चोरीसाठी ही हत्या केल्याचा आरोप असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी गणेश कांबळे अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.

जयेश आणि गणेशची ओळख साताऱ्यात काम करत असताना झाली होती. पोलिस तपासात उघड झाल्यानुसार, या दोघांनी मिळूनच जोशी यांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला. तोंडात कपड्याचे बोळे घालून, मान आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली होती. हात-पाय देखील बांधले होते.

हत्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न जयेशने केला. कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क, सीसीटीव्हीचा डीव्हीडीआर, जोशींचा मोबाईल अशा महत्त्वाच्या वस्तू गायब करून, काही वस्तू मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली पुलावरून फेकल्या. मात्र पोलिसांनी त्या शोधून काढल्या.

जोशी यांचा प्रवासासाठी जयेश हा ट्रॅव्हल एजंट म्हणून परिचित होता. आसाम, पुणे अशा अनेक सहलींसाठी त्याने त्यांचा प्रवास व्यवस्थापित केला होता. हैदराबादच्या सहलीसाठीही त्या त्याच्याकडे संपर्कात होत्या. जोशींकडे मोठ्या प्रमाणात पैसे व दागिने असतील, या हेतूनेच त्याने गणेशच्या मदतीने खूनाचा कट रचला.

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि घरात मिळालेल्या जुन्या प्रवास तिकिटावर जयेशचे नाव आढळल्याने पोलिसांना धागा मिळाला. या पुराव्यांच्या आधारे जयेशला अटक करण्यात आली. अधिक तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button