
पोस्ट खात्याची १७१ वर्षे सुरू असलेली रजिस्टर्ड एडी ही सेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचे संकेत
पोस्ट खात्याची ब्रिटिश काळात म्हणजेच १७१ वर्षे सुरू असलेली रजिस्टर्ड एडी ही सेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचे संकेत पोस्ट खात्याने दिले आहेत. याऐवजी आता स्पीड सेवा ही एकच सेवा राहणार असून तिच्या नवीन दराबाबत येत्या आठ दिवसांत वरिष्ठ स्तरावरून कळविले जाणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक अनंत सरंगले यांनी दिली.अधिक कार्यक्षम सेवेसाठी हा निर्णय पोस्ट खात्याने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
ब्रिटिश काळात पोस्टाची सेवा सुरू झाली. अगदी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचलेल्या पोस्टाने ग्रामीण जनतेशी आपली नाळ आताही कायम ठेवली आहे. सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्याने पोस्टाच्या तारसेवा, आंतर्देशीय पत्रे, साधे पोस्टकार्ड या सेवा बंद पडल्या. त्यांचा वापर अत्यंत कमी झाला. रजिस्टर्ड एडी ही सेवा मात्र आजही लोकप्रियता टिकवून आहे. या सेवेत टपाल पोहोचल्यानंतर घेणाऱ्याच्या सहीसह पोहोचदेखील मिळते. त्यामुळे रजिस्टर्ड एडी ही सेवा अत्यंत विश्वसनीय मानली जाते. शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही या सेवेचा वापर होत आहे.
बदलत्या काळानुसार आता पोस्टही हायटेक झाले आहे. आता तर बॅंकिग क्षेत्रातही पोस्टाने पदार्पण केले आहे. त्यामुळे वेगवान असलेल्या स्पीड पोस्टचा पर्याय स्वीकारून रजिस्टर्ड एडी ही सेवा दीर्घ काळानंतर पोस्टाने बंद करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे डाकघर अधीक्षक सरंगले यांनी सांगितले.