
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघाकडून निषेध
आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अवमान करण्यात आला. त्यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या राकेश किशोर नामक वकीलावर कठोर कारवाई करण्याची मागणी बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघाने निवेदाद्वारे केली आहे.
जिल्हाध्यक्ष भास्कर कुरतडकर, सरचिटणीस शरद कांबळे, कार्याध्यक्ष जे पी जाधव, उपाध्यक्ष एम. बी. कांबळे, कोषाध्यक्ष सुनील पवार यांच्या सहीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात राकेश किशोर नामक वकीलाने देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई (Chief Justice B. R. Gavai) यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. कोर्ट रूममध्ये उपस्थित असलेल्या राकेश किशोर या वकिलाने मा. सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ही अतिशय निंदनीय व खेदजनक घटना आहे. या बद्दल भारतीय नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ रत्नागिरीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात येत आहे.”
“या राकेश किशोर या व्यक्तिने न्याय व्यवस्थेवर हल्ला केला असून भारतीय संविधानाचा अवमान केला आहे. भारताचे सरन्यायाधीश पदी कार्यरत असलेले भूषण गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा कोर्टरूमध्ये अन्य वकील वर्गाचे उपस्थितीत त्यांच्यासमोर अशा प्रकारची कृती करून सरन्यायाधीश पदाचा अवमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ति विरूध्द अशा प्रकारची घटना घडल्यामुळे न्यायपालिकेच्या सुरक्षिततेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच लोकशाही विरोधी, जातीयवादी राकेश किशोर या वकीलाविरुध्द कठोरातील कठोर कारवाई करून योग्य ती शिक्षा करण्यात यावी,” अशी मागणी या निवेदनात केली आहे.




