चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर घालणारी फोटो गॅलरी – आमदार शेखर निकमवनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उदघाटन


रत्नागिरी, दि. 4 ) : कोकणच्या एका बाजूला भव्य असा सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. वन विभागाच्या फोटो गॅलरीच्या माध्यमातून नव्या पिढीला प्राणी आणि पक्षांची माहिती होईल. ही फोटो गॅलरी चिपळूणच्या पर्यटनात, सौंदर्यात भर घालणारी आहे, असे गौरवोद्गार आमदार शेखर निकम यांनी काढले.


वनविभागाच्या चिपळूण येथील कार्यालयात जिल्हा नियोजन योजना 2024-25 अंतर्गत करण्यात आलेल्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आमदार श्री. निकम यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष विश्वास उर्फ भाऊ काटदरे यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, मुख्याधिकारी विशाल भोसले, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष शहानवाज शहा आदी उपस्थित होते.


आमदार श्री. निकम म्हणाले, या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलमध्ये देशी झाडांबद्दल देखील माहिती असावी. नव्या पिढीला यामधून निश्चित चांगली माहिती मिळेल. झाडांबद्दल प्रेम निर्माण होऊ लागेल. त्यामधून निश्चितपणे जंगल संगोपनाकडे सर्वांचे लक्ष जाईल. केवळ झाडे लावून चालणार नाहीत तर चांगल्या पध्दतीने झाडांचे संगोपन झाले पाहिजे. देशी झाडे लावली पाहिजेत. महिन्यातून किमान एकदा विद्यार्थी, नागरिकांसाठी निसर्गाशी निगडित व्याख्यान मालिका सुरु झाल्यास खऱ्या अर्थाने याचा चांगला उपयोग होईल. तालुक्यातील सरपंचांची सभा घेऊन वनविभागाच्या योजनांची माहिती देण्यात यावी.
ताडोबासारखी निसर्गसंपदा कोकणाला लाभली आहे.

प्राणी पक्षांचे दर्शन देखील याठिकाणी होते. त्याची प्रसिद्धी व्हायला हवी. ती झाल्यास निश्चितच आपल्या भागात पर्यटन वाढेल. बांबू लागवडीवर भर दिल्यास उत्पन्न देखील वाढेल. वन विभागाने खैर नर्सरीप्रमाणे बांबू नर्सरी करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोठ्याप्रमाणात बांबू रोपे उपलब्ध होतील. वनविभागाने देशी झाडे लावण्याबाबत भर द्यावा, असेही आमदार श्री. निकम म्हणाले.


प्रांताधिकारी श्री. लिगाडे म्हणाले, कोकणाला पर्यटन म्हणून प्रसिद्धी नाही. ती करावी लागेल. लोकांना याबाबत माहिती द्यावी लागेल. पर्यटन वाढण्यासाठी विदर्भाप्रमाणे इकडेही बौध्द पौर्णिमेला प्राणी गणना करावी. म्हणजे येथील असणाऱ्या प्राणी आणि पक्षांचा निश्चित आकडा मिळू शकेल. श्री. काटदरे, श्री. शहा यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विभागीय वन अधिकारी श्रीमती देसाई यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली.


कार्यक्रमाला पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, बापू काणे, माजी सभापती बाळशेठ जाधव, ग्लोबल टुरिझम अध्यक्ष रामशेठ रेडीज, माजी सभापती रसिका देवळेकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती लगड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button