
देव – घैसास- कीर वरिष्ठ महाविद्यालयात डिजिटल पेमेंट क्रांतीवर अर्थशास्त्र विषयक सेमिनार
रत्नागिरी : भारत शिक्षणमंडळाचे देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील डिजिटल पेमेंट क्रांती: आर्थिक समावेशनाचे वास्तव आणि ग्राहकांचे हक्क’ या विषयावरील एकदिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिनेश माश्रणकर उपस्थित होते.
सेमिनारची सुरुवात आर्थिक साक्षरतेची शपथ घेऊन झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर यांनी केले. त्यानंतर डॉ. माश्रणकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल पेमेंट म्हणजे काय, डिजिटल पेमेंट चे फायदे,भारतातील डिजिटल पेमेंट क्रांती- एक संक्षिप्त आढावा, वित्तीय समावेशनासाठी महत्त्वाचे टप्पे तसेच डिजिटल पेमेंट व ग्राहकांचे संरक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख वक्ते डॉ. माश्रणकर सर यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या सेमिनारसाठी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख सौ. भोवड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर उपस्थित होते. तसेच प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष कला शाखेतील अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी व प्रथम वर्ष वाणिज्यचे विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेतील आर्या पावरी हिने केले तर आभारप्रदर्शन तृतीय वर्ष कला शाखेतील प्रणव लिंगायत याने केले.