
सरकारी योजनेच्या लाभार्थींसाठी महत्तवाची बातमी! आता लाभाचे पैसे ३ महिने बॅंकेत पडून राहिल्यास ती रक्कम शासनजमा होणार; कागदपत्रे न देणाऱ्या निराधार लाभार्थींचा शोध सुरू!
सोलापूर : शासनाच्या वतीने सध्या महसूल सप्ताह राबविला जात असून त्याअंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील नव्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. यावेळी त्यांना तलाठ्यांमार्फत शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे एक लाख ५७ हजार लाभार्थी आहेत. याशिवाय दरमहा सुमारे ५०० लाभार्थी वाढत आहेत. डिसेंबर २०२४ पासून प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ ‘डीबीटी’द्वारे थेट दिला जात आहे. पण, त्यासाठी सर्व लाभार्थींना त्यांची कागदपत्रे सोलापूर शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहेत. सात महिन्यांत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार लाभार्थींनी कागदपत्रे सादर केली, पण आणखी १५ हजार लाभार्थी पुढे आलेले नाहीत. ते लाभार्थी जोपर्यंत आधार प्रमाणीकरण करून त्यांची वैयक्तिक कागदपत्रे डीबीटी पोर्टलवर अपलोड करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळणारच नाही. यासंदर्भात देखील महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती केली जात आहे.
पात्र लाभार्थींना निराधार योजनेचा मिळतो लाभ
सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील १५ हजार लाभार्थींनी अद्याप त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यांची कागदपत्रे ‘डीबीटी’ पोर्टलवर अपलोड न झाल्यास त्यांना लाभाची रक्कम मिळणार नाही. महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थींना तलाठ्यांमार्फत घरोघरी मंजुरी पत्र दिले जात आहे.-शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर
…तर बॅंकेतील रक्कम शासनजमा होणार
शासनाच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींसाठी दरमहा अनुदान दिले जाते. त्यांना अडचणी येऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे. तरीपण, तीनपेक्षा जास्त महिने होऊनही एखादा लाभार्थी योजनेचे बॅंक खात्यातील रक्कम घेऊन गेलेला नसल्यास त्यांची रक्कम बॅंकांमार्फत पुन्हा शासनजमा केली जात आहे. शासनाचे तसे आदेश आहेत. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या अधिकाऱ्यांनी बॅंकांना पत्रव्यवहार केला आहे.