
गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची उच्चस्तरीय बैठक; अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांचे १३ निर्देश
रत्नागिरी जिल्ह्यात हातखंबा व निवळी या ठिकाणी घडलेल्या एलपीजी गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नितीन बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑगस्ट २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस संबंधित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी, रस्ते कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच JSW जयगड, ईगल इन्फ्रा लिमिटेड, ब्लूम कंपनी, कॉन्फिडंस पेट्रोलियम, JSW JPL व जयगड पोर्ट यांचे प्रकल्प व्यवस्थापक, रत्नागिरी ग्रामीण पोलीस आणि जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत एलपीजी गॅस टँकरच्या वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनांमुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे, यावर एकमत झाले. याच अनुषंगाने गॅस टँकर चालकांची वेळोवेळी वैद्यकीय व शारीरिक तपासणी केली जावी, चालकांना मोबाईलचा वापर वाहन चालवताना टाळण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत आणि त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने सज्ज करावे, असे निर्देश देण्यात आले. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
गॅस टँकर ताफ्याचा वेग २० किलोमीटर प्रतितास मर्यादित ठेवून त्यास एस्कॉर्टद्वारे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. टँकर चालकांना गणवेश आणि सहाय्यक चालक देण्याचे सूचित करण्यात आले असून, गॅस टँकरच्या व्हॉल्व्ह व फ्रेम डिझाइनमध्ये सुधारणा करून अधिक सुरक्षित बनवण्याचा मुद्दाही मांडण्यात आला. हातखंबा येथे कायमस्वरूपी बचाव वाहन उपलब्ध ठेवावे आणि बचाव पथकास योग्य प्रशिक्षण द्यावे, यावर भर देण्यात आला. टँकर चालकांना आपत्कालीन संपर्क क्रमांक लेखी स्वरूपात देण्याचेही आदेश देण्यात आले.
या बैठकीत एनएचएआय व आरटीओ अधिकाऱ्यांनाही ठोस सूचना देण्यात आल्या. महामार्गावर योग्य ठिकाणी सुरक्षा फलक व सूचना चिन्हे लावावीत, रस्त्यांचे डांबरीकरण जलदगतीने पूर्ण करावे, अपघात प्रवण भागांमध्ये स्पीड ब्रेकर उभारावेत व वाहनचालकांसाठी नियमित जागरूकता शिबिरे घेण्यात यावीत. तसेच गॅस टँकरची अचानक तपासणी करून ओव्हरलोडिंग व मद्यप्राशनाचे प्रकार आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.