
नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या; पतीचाही मृतदेह सापडला, चिपळूण शहरात हळहळ
चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोन दिवसांपूर्वी वाशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित दाम्पत्याच्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असतानाच, गुरुवारी पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह सापडल्यानंतर अखेर रविवारी मालदोली खाडीत पती निलेश अहिरे याचा मृतदेहही आढळून आला. या धक्कादायक घटनेमुळे चिपळूण परिसरात शोककळा पसरली आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रहिवासी असलेले निलेश अहिरे शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आले होते. डीबीजे महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बसस्थानकाजवळ स्वतःची मोबाइल शॉपी सुरू करून मृदू स्वभाव, सचोटी आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसायात स्थिरता प्राप्त केली. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानंतर त्यांनी नातेवाइकांच्या घरातून बाहेर पडून तीन-चार वर्षे भाड्याच्या खोलीत एकटेच वास्तव्य केले.
८ मे २०२५ रोजी निलेश यांचा अश्विनीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांनीही नव्या संसाराची सुरुवात मोठ्या आशा-आकांक्षांनी केली होती. पर्यटनस्थळांना भेटी, नातेवाइकांचे सहवास आणि आनंदाचे क्षण यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरू होते. काही दिवसांपूर्वीच अश्विनीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला होता. तिची आई आणि मामा काही दिवस त्यांच्या घरी मुक्कामी होते. त्यानंतर अचानक बुधवार, ३० जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघांनी गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस, एनडीआरएफ पथक, स्थानिक प्रशासन व नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली होती. गुरुवारी सकाळी अश्विनीचा मृतदेह सापडला होता, तर चौथ्या दिवशी शनिवारी निलेश याचा मृतदेह दाभोळ खाडी परिसरात आढळून आला. स्थानिक बोटीच्या सहाय्याने आणि किनारी गावांमध्ये सतर्कतेच्या सूचना देऊन शोधमोहीम राबवण्यात आली होती.
या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आणि कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नव्याने उभं राहिलेलं एक तरुण दांपत्य अचानक संपुष्टात आल्याने नातेवाईक, परिचित, तसेच चिपळूणकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक व वैयक्तिक पातळीवर संवादाचा अभाव आणि मानसिक ताण याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधून ही घटना गेली आहे.