
रत्नागिरीचे युवा उद्योजक गौरांग आगाशे ‘न्यू जेन आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित
पाचवा टॅली एमएसएमई पुरस्कार समारंभ हटिल सहारा स्टार मुंबई येथे नुकताच उत्साहात झाला. यामध्ये रत्नागिरीतील तरुण उद्योजक गौरांग आगाशे यांना ‘अनबॉक्स युवर डिझायर या रत्नागिरीमधील फूड डिलिव्हरी व्यवसायाकरिता “ज्यू जेन आयकॉन” म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रतिवर्षी टॅली सोल्युशन्स ही बंगलोर स्थित व्यवसाय नियोजन सॉफ्टवेअर उद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरसाठी प्रसिद्ध कंपनी टॅली एमएसएमई सन्मान सोहळा आयोजित करत असते. २५ लक्षाहून अधिक टॅली वापरकर्ते तसेच एमएसएमई नोंदणीकृत व्यवसायामधून नामनिर्देशन केले जाते. एकूण पाच श्रेणी यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत, बिझिनेस माइस्ट्रो, बंडर वूमन, न्यू जेन आयकॉन, टेक ट्रान्सफॉर्मर व चॅम्पियन ऑफ कॉज. महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातून २० हजार नामनिर्देशने विविध श्रेणीमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, गौरांग आगाशे यांना मिळालेल्या पुरस्काराबदल रत्नागिरीतील उद्योगक्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.