भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार

भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कोकण विभागातील एक प्रमुख तटरक्षक कार्यालय आहे, जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडते. सेवा बजावत असलेल्या कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठीची सोय बळकट करण्याच्या दृष्टीने, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्यासोबत दिनांक ३१ जुलै २५ रोजी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

हा करार एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे, ज्याद्वारे हे हॉस्पिटल भारतीय तटरक्षक दलासाठी आरोग्यविषयक तज्ञ सल्ला आणि उपचार सेवा देणारे रत्नागिरी शहरातील पहिले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ठरले आहे. या उपक्रमामुळे सशस्त्र दलाच्या समुदायाला आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध होतील, आणि नागरी-लष्करी आरोग्य सहकार्याच्या दृष्टीने एक नवा आदर्श निर्माण होईल.

या करारा अंतर्गत विविध तज्ज्ञ विभागांतील वैद्यकीय सल्ला, आरोग्य सुविधा आणि उपचार सेवा केंद्र शासन आरोग्य योजना (CGHS) मुंबई दरांमध्ये उपलब्ध होतील. या सुविधांचा लाभ सेवा बजावत असलेल्या तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना, संरक्षण मंत्रालयाशी संलग्न नागरी कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचाऱ्यांना, माजी सैनिकांना आणि त्यांच्यासोबतच्या कुटुंबीयांना मिळणार आहे.

हा करार कमांडंट शैलेश गुप्ता, कमांडिंग ऑफिसर, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि श्री. रविंद्र परदेशी, प्रकल्प संचालक, लोकमान्य हॉस्पिटल यांच्यामध्ये करण्यात आला. करार स्वाक्षरी समारंभास सर्जन लेफ्टनंट कमांडर गोपान जीजे, स्टेशन वैद्यकीय अधिकारी, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि साधना फाउंडेशनच्या डॉ. समिता गोरे, संचालक, लोकमान्य हॉस्पिटल आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ तसेच हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते.

ही धोरणात्मक भागीदारी कोकणातील तटरक्षक दल समुदायासाठी वैद्यकीय सेवा अधिक सुलभ, परवडणाऱ्या दरात आणि वेळेत उपलब्ध करून देण्यास मदत करेल. त्यामुळे त्वरित निदान, लवकर उपचार व एकूणच चांगले आरोग्य परिणाम साध्य होतील.

डॉ. प्रदीप ढवळ यांनी या कराराचे स्वागत करताना तटरक्षक दलाच्या कामगिरीचे कौतुक केले. “सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाची उपस्थिती आणि योगदान अमूल्य आहे,” असे त्यांनी सांगितले.

हा सामंजस्य करार केवळ औपचारिक बाब नसून नागरी – लष्करी भागीदारीद्वारे सशक्त, स्थानिक आरोग्य सेवा प्रणाली उभारण्याचे प्रतीक आहे, जे राष्ट्राच्या सशस्त्र सेवांना पाठबळ देईल. या उपक्रमामुळे देशातील इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या सहकार्याचे आदर्श निर्माण करून सशस्त्र दलांसाठी सर्वसमावेशक व समर्पित आरोग्य सेवा प्रणाली उभारण्यास चालना मिळेल असे मत कमांडंट शैलेश गुप्ता यांनी यावेळी प्रकट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button