दहावी व बारावी परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना देय असलेल्या सवलतीबाबत


रत्नागिरी, दि. 31 ): ऑटिस्टिक (स्वमग्न) या प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सवलतीसंदर्भात 30 जुलै रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने सचिव राज्य मंडळ पुणे यांनी खुलासा केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी प्रविष्ट होणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार १६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये विविध सवलती मंडळाकडून दिल्या जातात.
केंद्र शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांसंदर्भात स्वावलंबन प्रमाणपत्र (युनिक डिसॲबिलीटी आयडी कार्ड) निश्चित केलेले असून एखा‌द्या विद्यार्थ्यांकडे जर दिव्यांग प्रमाणपत्रांऐवजी असे स्वावलंबन प्रमाणपत्र असेल व त्यांनी सदर प्रमाणपत्र विभागीय मंडळ कार्यालयास दिव्यांग प्रस्तावासोबत सादर केलेले असल्यास विविध सवलतीकरिता अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची प्रतिस्वाक्षरी असलेले विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू नये असे सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळाकडून नियमानुसार विविध सवलती दिल्या जातात.
सन 2023-24 पासून याबाबत कार्यवाही करण्यात येत असून निर्धारित सुविधेपासून कोणताही दिव्यांग विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता मंडळाकडून घेण्यात आलेली आहे. जरी एखाद्या विद्यार्थ्याकडे स्वावलंबन प्रमाणपत्र नसले तरी त्याच्याकडे विहीत नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळाकडून नियमानुसार विविध सवलती देण्याबाबतची कार्यवाही मंडळाकडून केली जाते. त्यामुळे याबाबत संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी यांनी संभ्रम बाळगू नये, असे मंडळाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button