
खांदेरी किल्ल्याजवळ बुडालेले तीन मच्छीमार अद्यापही बेपत्ता!
रायगड : खांदेरी किल्ल्याजवळ उरण येथील एक मासेमारी बोट बुडाली होती. यातील तीन मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. तीघांचाही शोध अद्यापही सुरूच असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.
उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छीमार बोट शनिवारी मासेमारी साठी गेली होती. वादळी वारे आणि उसळणाऱ्या लाटांमुळे ही बोट खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. यावेळी बोटीवर एकूण ९ खलाशी होते, ज्यातील पाचजणांनी ९ तास पोहत किनारा गाठला. मात्र नरेश राम शेलार, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील हे तिघे खलाशी बेपत्ता आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तीघांची शोध मोहीम सुरू केली, तटरक्षक दलाचीही मदत घेण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्यांचा मदतीने संपुर्ण अलिबाग किनार पट्टीवर शोध मोहीम राबविण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीकडून किनाऱ्यांवर पहाणी करण्यात आली. मात्र रविवारी संध्याकाळ पर्यंत तिघांचाही शोध लागला नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगीतले.
दरम्यान बोटीतून बचावलेल्या हेमंत बळीराम गावंड रा. आवरे, संदीप तुकाराम कोळी रा. करंजा, रोशन भगवान कोळी रा. करंजा, शंकर हिरा भोईर रा. आपटा, कृष्णा राम भोईर रा. आपटा या पाच जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
कोकण किनारपट्टीवर सध्या मासेमारी बंदी लागू आहे. समुद्र खवळलेला आहे. अमावस्येनंतर समुद्राला मोठी उधाणेही येत आहेत अशा परिस्थितीत ही बोट मासेमारीसाठी कशी गेली, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच मच्छीमार सोसायटीने त्यांना अटकाव का केला नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.