राज्यस्तरीय शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे* *३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

रत्नागिरी, दि. 23 :- राज्यातील शेतीत नव-नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उत्पादन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही अभिनव योजना सुरू केली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत. सर्व शेतकरी बंधू व भगिनींना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना प्रगतशील शेतीचा अनुभव घेण्यासाठी युरोप, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झरलँड, इस्त्राईल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया, फिलीपाईन्स, चीन, द. कोरिया इत्यादी देशांमध्ये निवडक अभ्यास दौऱ्यांवर पाठवण्यात येणार आहे. या दौऱ्यांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढवणे तसेच त्यांना जागतिक स्तरावरील शेतीत होणारे बदल समजावून घेणे हा आहे.

योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदाराचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्ष पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही. लाभार्थी शेतकरी असावा. स्व-उत्पन्नाचा चालू कालावधीचा ७/१२ व ८ अ उतारा आवश्यक. शेतकऱ्यांचे मुख्य साधन शेती असावे व तसे स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. शेतकरी-युवांचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक. शेतकरी कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अभियंता, कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या) कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठांमार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. निवडीनंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोना विषयक तपासणी करुन तसा अहवाल सादर करावा. या अहवालानुसार शेतकऱ्यांस कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसावी. तसेच सलग ७ ते १० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.

शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये यापैकी कमी असेल, ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. दौऱ्याकरिता जिल्ह्यातील ५ शेतकऱ्यांना (जिल्ह्यात १ महिला शेतकरी व १ केंद्र/राज्य स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त/पीक स्पर्धा विजेते शेतकरी व इतर ३ शेतकरी) निवडले जातील.

आवश्यक कागदपत्रे चालू सहा महिन्याचा ७/१२ उतारा, आधार कार्डची प्रत, रेशनकार्डची प्रत, डॉक्टरांकडून मिळालेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र, वैध पासपोर्टची प्रत आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी ४ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे दुपारी २ वाजता उपस्थित रहावे. प्राप्त अर्जातून जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button