
“रत्नदुर्ग”वरील झेंडा वारंवार गायब होणे व आजूबाजूच्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करावी गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.
रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावरील सांबवाडी परिसरातील पाणबुरुजावर लावलेला झेंडा वारंवार गायब होणे व आजूबाजूच्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याबाबत गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग गड प्रेमींनी आज (२१ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रत्नागिरी नगरपालिका यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी या संदर्भात योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अन्यथा शिव भक्त व सकल हिन्दू समाजाकडून मोर्चा तसेच उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा देण्यात आला.यावेळी गड प्रेमी गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग अध्यक्ष दीपेश वारंग, संपर्क प्रमुख तन्मय जाधव तसेच गड सेवक सचिन कळंबटे, श्रीकांत कदम, शशिकांत जाधव, हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, विष्णू बगाडे उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला रत्नदुर्ग किल्ला हे आमचे गौरवाचे व ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. सदर किल्ल्यावरील सांबवाडी परिसरात असणाऱ्या प्राचीन बुरुजाच्या आजूबाजूला अलीकडच्या काळात काही अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या शिकलीन वास्तू समोरच नगर परिषदेने बांधून दिलेले शौचालय आहे. त्यामुळे शिवकालीन वास्तूची विटंबणा होत आहे अशा आम्हा शिवभक्तांच्या तसेच स्थानिकांच्या भावना आहेत.ही बांधकामे पुरातत्त्व विभागाच्या तसेच स्थानिक प्रशासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय चालू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केवळ ऐतिहासिक वारशाचे नुकसानच होत नाही, तर भविष्यातील संवर्धनाच्या दृष्टीनेही हे एक गंभीर संकट आहे. याशिवाय, अशा अनधिकृत बांधकामांमुळे भविष्यात इतर अनधिकृत घुसखोरीला देखील खतपाणी मिळू शकते.
गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागामार्फत साधारणतः एक वर्षांपूर्वी रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेल्या ऐतिहासिक पाणबुरुजावर सन्मानचिन्ह म्हणून भगवा झेंडा उभारण्यात आला होता. हा झेंडा आमच्या संस्थेच्या प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ आणि गड किल्ल्यांच्या जतनासाठी लावण्यात आला होता.परंतु, दुःखद बाब म्हणजे, हा झेंडा वारंवार अज्ञात व्यक्तींकडून काढून टाकला जात आहे. या संदर्भात संस्थेने स्थानीक पातळीवर माहिती घेतली असता, पाणबुरुजाजवळील अनधिकृत वस्तीमध्ये राहणाऱ्या काही व्यक्तींकडून सदर प्रकार होत असल्याचा संशय बळावत आहे. तसेच त्या भागात राहणाऱ्या सर्व समाजातील लोकांनी देखील अनधिकृत बांधकाम काढून टाकावे यासाठी सहमती दर्शविली आहे असे समजले आहे.गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा या संस्थेमार्फत आम्ही या संदर्भात आपल्याकडे खालील मागण्या करीत आहोत.1. संबंधित बुरुजाच्या परिसरात सुरु असलेली सर्व अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करावी.2. ऐतिहासिक वास्तूंवर होत असलेल्या अशा कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.3. रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी एक विशेष पथक स्थापन करून त्याद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवावे.4. स्थानिक प्रशासनाने व पुरातत्त्व विभागाने यापुढे अशी प्रकरणे रोखण्यासाठी एक संयुक्त कृती आराखडा तयार करावा,आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेवून त्वरित कार्यवाही कराल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.