
वित्त विभागाने नकारघंटा दिल्याने फणस संशोधन केंद्र दापोली तालुक्यातील वाकवली येथे होणार
फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने दिला आहे. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. यावर सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनीही आक्षेप घेतला असला तरी आता वित्त विभागाने नकारघंटा दिल्याने फणस संशोधन केंद्र दापोली तालुक्यातील वाकवली येथे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.देश आणि परदेशातील फणस जातींचा अभ्यास करणे, वाणांचा संग्रह, तुलनात्मक अभ्यास, फणसाचे गरे, फणस कुयरीची भाजी, तयार फणसाची भाजी, फणस पल्प व त्यापासून उत्पादने, ताज्या तसेच उकडलेल्या बिया व त्याची पावडर, वर्षभर फणसाचे उत्पादन, फणसाच्या स्वतंत्र जाती तयार करणे, पडीक जमिनीवर लागवड करणे, रोग, किडी, शाखीय व्यवस्थापन यासाठी संशोधन करणे, शेतकर्यांना रोपवाटिका, उत्पादन पद्धती तसेच प्रक्रिया पदार्थ यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण राबवणे, यासाठी हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.फणसाला भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा येथे फणस संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे असताना घेण्यात आला होता. यासाठी ४० कोटींचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केला होता. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात होती. मात्र वित्त विभागाच्या नकारघंटेनंतर लांजा येथील प्रस्तावित संशोधन केंद्राचा प्रस्ताव गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे.www.konkantoday.com