
मुक्या प्राण्यांमधील संवेदनशीलता! वाहून जाणाऱ्या गायीला म्हशींनी वाचवलं
वाहून जाणाऱ्या एका गायीला चक्क तीन म्हशींनी वाचवण्याची आश्चर्यकारक घटना राजापूर येथे घडली आहे. राजापूर नगर परिषदेचे कर्मचारी संदेश जाधव यांनी हा अनोखा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.
आज, शुक्रवारी सकाळी राजापूर शहरात ही घटना घडली आहे. अर्जुना नदीच्या पात्रालगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरुन एक गाय नदीपात्र पडून वाहून जात होती. जवळच असलेल्या तीन म्हशींनी नदीत उडी टाकत त्या गायीचे प्राण वाचवले आहेत.
गुरुवारी आठवडा बाजार असल्यामुळे त्याठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरु राजापूर नगर परिषदेचे सफाई कामगार करत होते. या ठिकाणी राजापूर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी संदेश जाधवही उपस्थित होते. साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचे काम सुरु असताना ही गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरुन पाण्यात पडली.
अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती वाहून जाऊ लागली. याचवेळी त्याठिकाणी असणाऱ्या तीन म्हशींनीही लागलीच पाण्यात उड्या मारल्या व त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत, किंबहुना तीनही बाजूंनी कव्हर करून पलिकडच्या किनाऱ्यावर नेले.