
निओमोशन गाडी मिळाल्याने दिव्यांग झाला स्वावलंबी सालिक करतोय झोमॅटोची डिलीव्हरी.
रत्नागिरी : कॉलेज जीवनात समुद्रात आंघोळ करताना मानेला झालेल्या दुखापतीमुळे स्पायनल इंज्युरी झाली आणि सालिक अब्दुल्ला भाटकर (वय ३४, रा. मजगाव म्हामुरवाडी) याला अपंगत्व आले. परंतु आरएचपी फाउंडेशन, फ्रेंड्स फाउंडेशनमुळे त्याला निओमोशन इलेक्ट्रिक गाडी मिळाल्याने आता तो झोमॅटो अॅपद्वारे डिलीव्हरीचे काम करत आहे. आता तो स्वावलंबी होत असून कुटुंबानेही आरएचपी फाउंडेशनचे आभार मानले.सालिक यांचे शिक्षण अकरावी व नंतर इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स केला. शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. वडील अब्दुल्ला भाटकर बीपीटीमध्ये काम करत होते.
आई बेगम भाटकर या गृहिणी आहेत. सालिकला ७ भावंडे आहेत. सगळे नोकरी करतात. २०११ साली वयाच्या २० व्या वर्षी मित्रांसोबत गणपतीपुळ्याला गेलेला तेव्हा आंघोळीसाठी पाण्यात उडी मारली. तेव्हा मानेला मार लागल्याने स्पायनलकॉर्ड इंज्युरी झाली. कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्या आणि पॅराप्लेजिक झाला.कोल्हापूरच्या सिटी हॉस्पीटलला तो २५ दिवस उपचार घेत होता. दोन महिने केरळला पंचकर्म मसाज थेरपी केली. पण काहीच फरक पडला नाही. तीन वर्षानंतर व्हीलचेअर वापरायला लागला. व्हीलचेअर त्याने स्वत: खरेदी केली. त्याकरिता युट्युबवरून मार्गदर्शन घेतले. पण व्हीलचेअरवरुन बाहेर जाऊन काम करणे शक्य नसल्याने त्याने रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लोजिक फाउंडेशनशी (आरएचपी) संपर्क साधून इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी मागणी केली होती.
आरएचपी फाउंडेशनच्या मदतीने आणि फ्रेण्ड्स फाउंडेशन (ऐरोली, मुंबई) यांच्या सहकार्याने सालिकचे नाव निओमोशन गाडीसाठी सुचविले होते. त्याप्रमाणे ऐरोली येथे इम्पॅक्ट गुरु फाउंडेशनने चेकअपसाठी आणि मेजरमेंटसाठी असे दोन वेगवेगळे कॅम्प घेतले. त्यात त्यामधे सालिक भाटकरची हिची निवड झाली. सात दिवसांचा ट्रेनिंग कॅम्प इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन, बजाज फिन्स आणि निओमोशनने रॉयल हिल्स रिसॉर्ट (ता. वसई) येथे घेतला. त्यात निओमोशन गाडीविषयी सविस्तर माहिती देऊन गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देऊन गाडी ताब्यात दिली. या कॅम्पमधे झोमॅटोचे प्रतिनिधी येऊन हॅण्डीकॅप लोकांना झोमॅटोचे फुड डिलिव्हरीचे ट्रेनिंग दिले. व ते स्वत:च्या पायावर कसे उभे राहु शकतात हे शिकविले.
एका दिव्यांग बांधवाने तो करत असलेले झोमॅटोचे काम व त्याचा येणारा अनुभव शेअर केला.निओमोशन गाडीमुळे त्याच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे. तो स्वावलंबी बनणार आहे. कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊन काम करू शकणार आहे. झोमॅटोमधे डीलिव्हरी बॉय बनून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारणार आहे. गाडी मिळाल्यावर सालिक खुप खुश झाला.