
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर येथील एका महिलेला ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा घातला
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर येथील एका महिलेला ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. निता प्रेमदास गमरे (वय ४६) यांना टेलिग्राम ॲप्लिकेशनवर ‘वंशिका’ नावाच्या अकाउंटवरून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी या ऑफरला होकार दिल्यानंतर, ‘customer support’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपमधील हिना, निखिल पाटील (ओनर), विघ्नेश (ॲडमिन) आणि टाटा क्लिक कंपनीचे सीनियर प्रमोटर सुमित यांनी त्यांना वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्यासही त्यांना सांगण्यात आले.
फिर्यादी सौ. गमरे यांनी त्यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख २९ हजार १३२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. मात्र, पैसे भरल्यानंतरही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. उलट, आरोपींनी त्यांना दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे भरण्याचा आग्रह केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौ. गमरे यांनी ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी १७:१६ वाजता पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना २३ जून २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीत घडली आहे.