
मुंबईतील शाळेतून दोन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल!
मुंबई :* दोन अज्ञात महिलांनी मुंबईमधील वांद्रे येथील एकदा शाळेतून दोन लहान मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. शाळेच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या महिला संबंधित मुलांच्या नातेवाईक असल्याचा दावा करून त्यांना शाळेतून सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होत्या.फिर्यादी महिला अफरोज उस्मान अली शेख (२८) ही वांंद्रे परिसरात राहते. तिला ७ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले वांद्र्याच्या एका प्रतिष्ठीत शाळेत शिक्षण घेत आहेत. बुधवारी दोन्ही मुले नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. त्यावेळी दोन अज्ञात महिला शाळेत आल्या.
मुलाची आजी आणि आत्या असल्याचा दावादोन्ही महिलांनी बुरखे परिधान केलेले होते. आम्ही या मुलांच्या आजी आणि आत्या असल्याचे त्यांनी सांगितले. कौटुंबिक कारणांमुळे यापुढे मुलांना शाळेत शिकवायचे नाही. आम्ही त्यांना घेऊन जायला आलो आहोत, असे त्यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला द्या, असेही त्या म्हणाल्या. यामुळे शाळा व्यवस्थापनाला संशय आला. शाळेने या दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. या दोन्ही महिला मुलांना घेऊन जाण्यासाठी शाळेतील शिक्षकांबरोबर वाद घालून लागल्या. दरम्यान, शाळेतील एका शिक्षकाने मुलांच्या आईला फोन करून त्वरित शाळेत येण्यास सांगितले. त्यामुळे या दोन्ही महिला लगेच शाळेतून पसार झाल्या.
शाळेत आल्यानंतर फिर्यादी अफरोज यांनी फोन करून मुलांच्या आजी आणि आत्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण शाळेत गेलो नसल्याचे सांगितले. त्यामुळे अनोळखी महिला मुलांना शाळेतून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्या महिला कोण होत्या ? आणि मुलांना शाळेतून पळवून नेण्यासाठी का आल्या होत्या ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत फिर्यादी अफरोज यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलांच्या पालकांव्यतिरिक्त कुणाही नातेवाईकांकडे आम्ही मुलांना सुपूर्द करत नाही, असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. त्या दोन महिलांच्या दबावाला बळी न पडता शाळेने मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यास ठाम नकार दिला. शाळेत मुलांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या त्या दोन अज्ञात महिलांविरोधात वांद्रे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही महिला बुरखा घालून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसले नाहीत. आम्ही सध्या शाळेच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची पाहणी करीत आहेत. त्याआधारे या आरोपी महिलांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती वांद्रे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.