
कृषि दिनानिमित्त कोळंबे येथे शेतकरी रॅली, वृक्षारोपण व माहितीपर कार्यक्रम; रावे विद्यार्थ्यांकडून भात बियाण्यावर थायरमने प्रक्रिया प्रात्यक्षिक.
कोळंबे – १ जुलै रोजी कृषि दिनाचे औचित्य साधून कोळंबे ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व पंचायत समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी रॅली, वृक्षारोपण व माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परीक्षित यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भव्य शेतकरी रॅलीने झाली. त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात काजु कलमाचे वृक्षारोपण करण्यात आले. शेती व शाश्वत कृषि तंत्रज्ञान यावर आधारित माहितीपर सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमात कृषि महाविद्यालय, दापोली अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोळंबे गावात कार्यरत असलेल्या ‘मृदासूत’ गटाचे विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थ्यांनी भात बियाण्यावर थायरम फंगीसाईडने बीज प्रक्रिया, ह्यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले. यामध्ये प्रक्रिया करण्याची पद्धत, प्रमाण व फायदे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

या तंत्रज्ञानाद्वारे बियाणे रोगप्रतिबंधक व उगमशीलतेस पोषक बनते, हे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.कार्यक्रमास एकूण १३३ शेतकरी आणि कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आमच्या कार्याचे कौतुक केले व अशा प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवले जात असल्याचे मत व्यक्त केले.हा कार्यक्रम कोळंबे ग्रामपंचायत, कृषि विभाग, पंचायत समिती रत्नागिरी आणि मृदासूत गटाच्या समन्वयातून अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देण्याचा हा प्रयत्न भविष्यातही सुरू ठेवण्याचा गटाचा निर्धार आहे.