
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार!
*मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर निर्माण झालेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच अद्यापही कायम आहे. प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी किंवा तरुण नेत्यांना संधी मिळावी, अशी काँग्रेसश्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र शिफारस केलेल्या नावांपैकी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कोणीही तयार नसल्याने आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनाच घ्यावा लागणार आहे.
विधानसभा निकालानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली असून, या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र आमदार सतेज पाटील यांनी या पदासाठी आपण असमर्थ असल्याचे कळवले. दुसरीकडे आमदार अमित देशमुख यांनीही इतक्यात आपल्याला प्रदेशाध्यक्ष व्हायचे नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असता, त्यांनीच आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. या महिनाभरात तरी प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही हेही आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी म्हटले.
सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यानंतर पुढचा पर्याय म्हणून माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे पाहिले जात आहे. यावर महिलांना संधी मिळाली तर चांगलीच बाब आहे, असे म्हणत आपण इच्छुक असल्याचे संकेत ठाकूर यांनी दिले आहेत.सतेज पाटील यांच्या नावाला पसंती सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाबबत असमर्थ असल्याचे म्हटले असले तरी त्यांच्या नावाला अधिक पसंती असल्याचे वरिष्ठ नेत्याने सांगितले. यासंदर्भात चर्चा झाली आहे. लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.