रत्नागिरी जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा गेल्या सात वर्षात ४६ जणांवर हल्ला


रत्नागिरी जिल्ह्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा वाढता वावर गंभीर स्वरूप धारण करत असून अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत आणि काही ठिकाणी मानव व बिबट्या संघर्ष चिघळल्याचे दृश्य दिसून येत आहे. गेल्या सात वर्षांत वन्यप्राण्यांनी जिल्ह्यातील ४६ जणांवर प्राणघातक हल्ले केले असून, या हल्ल्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४१ जण गंभीर जखमी, तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची नोंद आहे. मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ कोटी ९ लाख ४० हजार १६३ रुपयांची आर्थिक मदत वनविभागामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या फासकीत अडकणे, विहिरीत पडणे, अज्ञात वाहनांची धडक तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचे मृत्यूही वाढले आहेत. काही काळापूर्वी फासकीत अडकून मृत्यू होणार्‍या बिबट्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर पोलीस व वनविभागाने फासकीविरोधात कडक मोहीम राबवली असून, त्यातून काही प्रमाणात घट झाली असली तरी अधूनमधून उघडकीस येणार्‍या घटनांवरून फासकी लावण्याच्या
प्रकारात पुन्हा वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. मानवी वस्तीत येणार्‍या बिबट्यांना सुरक्षितपणे व नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यासाठी वनविभागाला जिल्हा नियोजन मंडळामार्फत अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. त्यातून पिंजरे, कॅमेरा ट्रॅप, वाहने आणि ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button