अमली पदार्थ बाळगणारा एकजण ताब्यात,रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची कारवाई


रत्नागिरी : शहर पोलिसांमार्फत गस्त सुरू असताना शहरातील पांढरा समुद्र परिसरात एकजण संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसी खाक्या दाखवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून एकूण ३० हजार रुपये किंमतीचा ७१६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. रोहित राजेंद्र चव्हाण (वय ३५ रा. घर नं. १३९१, आंबेशेत, ता. जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे ५ जून रोजी रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा परिसरात रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या उत्तर दिशेस सुमारे ५० मिटर अंतरावर मोकळ्या मैदानात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला म्हणून या पथकाने त्याच्याजवळ जाऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गाव न सांगता उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून या पथकाने त्याला योग्य पोलिस बळाचा वापर करून जागीच थांबविले व अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित राजेंद्र चव्हाण (वय ३५ रा. घर नं. १३९१, आंबेशेत, ता. जि. रत्नागिरी) असे सांगितले. लागलीच या पथकामार्फत दोन पंचांसमक्ष त्याची अंग झडती घेण्यात आली.

यात रोहित चव्हाण याच्या अंगझडतीमध्ये एक पांढऱ्या रंगाची पिशवी व त्यात एकूण १४ लहान व ३ मोठ्या प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या मिळून आल्या व त्यात काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला ‘गांजा” सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला. रोहित चव्हाण याला यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एकूण ३० हजार रुपये किंमतीचा ७१६ ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम ८ (क), २० (ब) (ई) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती गायकवाड, रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सपोफौ दीपक साळवी, पोहवा अरुण चाळके, पोहवा अमोल भोसले, पोहवा आशिष भालेकर, पोहवा पंकज पडेलकर, पोकॉ अमित पालवे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button