
संगमेश्वर कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा खून,दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
संगमेश्वर कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्दयीपणे खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. बानू फकीर महमद जुवळे (७०, रा. कडवई) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.त्या २ मे २०२५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची चुलत सून मुनीरा बशीर जुवळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ नापत्ता नोंद घेऊन तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला.
मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. २ मे २०२५ रोजी हाजीरा मुसा माखजनकर, रिजवान महमूद जुवळे (दोघे रा. कडवई, उभीवाडी) आणि हुमायू शकील काझी (रा. फणसवणे) यांनी संगनमताने टाटा नॅनो गाडी (एम.एच. ०५ ए. एक्स ९०९८) मधून बानू जुवळे यांचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे, मुनीरा बशीर जुवळे यांच्या फिर्यादीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७७/२०२५, बी.एन.एस. कलम १४० (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्यातील आरोपी रिजवान महमूद जुवळे हा सीवूड्स, मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रिजवान जुवळे, हुमायू शकील काझी आणि हाजीरा मुसा माखजनकर यांनी संगनमताने बानू फकीर मोहम्मद जुवळे यांचे अपहरण केले. त्यानंतर रिजवान जुवळे आणि हुमायू शकील काझी यांनी तिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नॅनो गाडीतून कडवई ते कुंभारखाणी बुद्रुक जाणारे रोडवरील खिंडीतील जंगलमय भागात खोल दरीत फेकून दिला. २३ मे २०२५ रोजी पोलीस कोठडीत असताना आरोपी रिजवान जुवळे याने घटनास्थळी मृतदेह दाखवला. तसेच, आरोपींनी महिलेच्या अंगावरून काढलेले ३० ग्रॅम ४५० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी विकलेल्या सोनाराकडून जप्त करण्यात आले आहेत.