राजापूर शहरातील पूर ओसरला; जनजीवन पूर्वपदावर

राजापूर : मागील दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून काहीशी विश्रांती घेतल्याने राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. पूर ओसरल्याने नदीकिनाऱ्यालगत असलेल्या व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर ओसरल्यानंतर अनेकांनी आपली दुकाने मांडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र प्रशासनाकडून ९ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आल्याने राजापुरात पुराचा धोका कायम आहे.
राजापूर तालुक्यात मंगळवारी सरासरी १३२.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये राजापूर मंडलात १४९, ओणी १४८, कुंभवडे ७४, नाटे १३२, जैतापूर १५२, कोंडये तर्फे सौंदळ ७४, पाचल सर्वाधिक १८९, सौंदळ १४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पडलेल्या पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुर आल्याने या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले होते. तर ग्रामीण भागातही नदी नाल्यांना पुर आल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने सांयकाळी उशीरा पुराच्या पाण्यात वाढ झाली व रात्री या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा देत पुढे शहर बाजारपेठेत प्रवेश केला.
त्यामुळे अनेक व्यापारी आणि नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने बुधवारी सकाळी या पुराच्या पाण्याने शिवस्मारकाच्या पुढे धडक मारली होती. मात्र बुधवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला आणि पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले. दुपारपर्यंत पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी आपले सामान लावण्यास सुरूवात केली. बुधवारी सकाळी शहरात पुराचे पाणी असल्याने शाळा व महाविद्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. तर जवाहर चौकातील एसटी वाहतूकही बंदच ठेवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button