
रत्नागिरी शहराजवळील फिनालेक्स कॉलनी जवळ मिर्या नागपूर रस्त्याचा भाग खचला, कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह
रत्नागिरीमध्ये मिर्या-नागपूर हायवेचे काम सुरु असून, फिनोलेक्स कॉलनीनजीक उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पर्या येथे काल रस्त्याचा भाग खचला त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुन्या रस्त्याने तात्पुरती वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. भाट्ये मार्गावरही सुरुबनातील झाडे पडल्याने वाहतूक संथ झाली होती. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत आहे हवामान विभागाने किनारपट्टीवर 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील व जोरदार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले तीन दिवस सातत्याने कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले आहे.रत्नागिरीमध्ये मिर्या ते नागपूर हायवेचे काम शहरालगत सुरु असून उद्यमनगर ते परटवणे जाणार्या नव्या मार्गाचा भाग बिबटीचा पर्या येथे कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आणि जुन्या मार्गावरुन वळवण्यात आली होती. पहिल्याच पावसात पर्याजवळीला भाग कोसळल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी जीवन देसाई यांना याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.