
ज्योती मल्होत्राची कबुली; “दानिशच्या सांगण्यावरुन दोनदा पाकिस्तान दौरा केला आणि..”.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला आणि तिथल्या काही अधिकाऱ्यांना भारतीय लष्कराची गोपनीय माहिती कळवल्याचा आरोप ज्योतीवर आहे. तिचे व्हॉग आणि तिच्या भारताबाहेरच्या ट्रिप्स या सगळ्याबाबत तिची चौकशी केली जाते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्राने पाकिस्तानच्या गुप्तचांना भेटल्याचं कबूल केलं आहे. व्लॉगच्या निमित्ताने तिने पाकिस्तानचा दौरा केला होता. त्या दरम्यान आपण पाकिस्तानच्या गुप्तचर ऑपरेटर्सना भेटलो होतो हे ज्योतीने मान्य केलं आहे. एवढंच नाही तर आपण पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात दानिश या अधिकाऱ्याच्या भेटीनंतर आपण त्याच्या सातत्याने संपर्कात होतो असंही ज्योतीने मान्य केलं. तसंच दानिशने तिला ज्या अली हसनशी ओळख करुन दिली होती त्याच्याही संपर्कात असल्याचं ज्योतीने मान्य केलं आहे.
ज्योतीने तिच्या जबाबात म्हटलं आहे की मी ट्रॅव्हल विथ जो नावाने युट्यूब चॅनल चालवते. माझ्याकडे पासपोर्ट आहे. मी २०२३ मध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालय दिल्ली या ठिकाणी गेले होते. पाकिस्तानचा व्हिसा मला मिळाला त्यानंतर मी पाकिस्तानला गेले. दिल्लीत दानिश या अधिकाऱ्याची आणि माझी भेट झाली. त्यानंतर माझा त्याच्याशी संपर्क वाढला. दानिशने सांगितल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार दोनदा पाकिस्तानला गेले होते. मी तिथे अली हसनला भेटले. अली हसनने पाकिस्तानात माझी राहण्याची आणि फिरण्याची सगळी व्यवस्था केली होती.
अली हसनने माझी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घडवून आणली. मी शकिर आणि राणा शाहबाज या दोघांना भेटले होते.शकिरचा मोबाइल नंबर मी जट रंधावा या नावाने मोबाइलमध्ये सेव्ह केला होता. त्यानंतर मी भारतात परतले होते. मी भारतात परतल्यानंतर Whats App, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमांतून पाकिस्तानातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसंच दिल्लीत जाऊन मी दानिशची भेट अनेकदा घेतली होती हे ज्योतीने मान्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच मी देशातली गुप्त माहिती पाकिस्तानला कळवली असंही तिने स्पष्ट केलं आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.
ज्योती मल्होत्रा ही एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. आलिशान आणि चैनीचं आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाली.वडिलांसह एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमवण्याची खूप घाई झाली होती. त्यामुळे तिने शिक्षण झाल्यावर तातडीने नोकरी शोधण्यास सुरुवात केली.शिक्षण झाल्यानंतर तिने सुरुवातीला म्हणजेच १४ वर्षांपूर्वी एका कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. मात्र ती नोकरी तिने सोडली.सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.त्यानंतर एका शाळेत आणि नंतर पुन्हा एका कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मात्र अनेक नोकऱ्या तिने गेल्या काही वर्षांत बदलल्या आणि साधारण दोन वर्षांपूर्वी तिने तिचं युट्यूब चॅनल सुरु केलं होतं.