
चिपळूणमध्ये एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या, मुस्लिम दाम्पत्याने हिंदू मुलीचे लग्न हिंदू संस्कृती प्रमाणे स्वखर्चाने लावून देत तिचे कन्यादान केले
चिपळूणमध्ये एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इमरान सय्यद यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या हिंदू मुलीचे लग्न हिंदू संस्कृती प्रमाणे स्वखर्चाने लावून देत तिचे कन्यादान केले.लहानपणापासून आई-वडील नसलेली प्रतिभा ही इमरान सय्यद याच्या घरी राहायला होती. घर काम करता करता ती इमरानच्या घरातली एक सदस्य बनली. सोळा वर्ष स्वतःच्या घरी राहिलेल्या या बहिणी समान मुलीचा विवाह सोमवारी (दि.१९) हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांनी लावून दिला. तिच्यासाठी अनुकूल वर शोधून त्याची घरची परिस्थिती तपासून हा विवाह ठरला. इमरान सय्यद याचे संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्यात सामील झाले व इम्रान व त्यांच्या पत्नीने पुढाकार घेऊन या दाम्पत्याने तिचे कन्यादान केले. इतकेच नव्हे तर लग्नासाठी लागणारे दागिने, आहेर, संसार उपयोगी भांडी, अशा अनेक गोष्टी भेट देऊन लग्नाचा संपूर्ण खर्च उचलत त्यांनी एक प्रकारे समाजासमोर आदर्श ठेवला आहे.