रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागवून कोयनेच्या अवजलाचे पाणी मराठवाड्याला द्या -म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत

कोयनेच्या अवजलाचे पाणी मराठवाड्यात नेण्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केले आहे. हे पाणी मराठवाड्याला द्यायला आमचा विरोध नाही. हे पाणी आधी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला द्यावे त्यानंतर उर्वरित पाणी मराठवाड्याला द्यावे असे आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.या विषयात कोणतेही राजकारण नसल्याने जिल्ह्यातील सर्वपक्षाचे लोकप्रतिनिधी खासदार,आमदार यांना एकत्र आणून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पेंडसे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणार आहाेत. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर २००४ साली माजी आमदार निशिकांत जोशी, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर ,विधानसभेचे माजी सचिव भास्कर शेटये,अॅड कल्पलता भिडे आदींनी कोयनेच्या अवजलाचे पाणी समुद्रात फुकट जात आहे त्याचा वापर जिल्ह्यात व्हावा अशी आपल्याकडे मागणी केली होती. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर कमिटी बनवण्यात आली होती.कोयनेच्या अवजलाचा पाण्याचा उपयोग रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी व्हावा यासाठी आपण शासनाकडे पिटीशन दाखल केले होते. त्यानंतर पंधरा ऑक्टोबर २००५
रोजी शासनाने जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री. म. दी. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची समिती केली होती.त्यामध्ये डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांच्यासह जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व कोकण पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे सदस्य म्हणून नेमणूक केली होती.त्यानंतर २००६ साली या समितीने अहवाल शासनाला सादर केला. या विषयावर २००७ साली आपण कोयनेच्या अवजला बद्दल सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर शासनाकडून या संदर्भात कोणतीही पुढे हालचाल झाली नव्हती.या योजनेसाठी रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी न्यायचे असेल तर अंदाजे १२००कोटी रुपये खर्च त्या वेळी येणार होता.परंतु यामुळे दोन्ही जिल्ह्यात कायमचे पुरेसे पाणी सिंचनासाठी ,पिण्याचे पाणी,स्वयं रोजगार, पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे अहवालात म्हटले होते. आता मुख्यमंत्री महोदयांनी हे पाणी मराठवाड्यात नेण्याचे सूतोवाच केला आहे. यासाठी मोठा निधी लागणार आहे. मराठवाडा हा आपल्या राज्याचा भाग आहे. त्या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने त्या भागाला पाणी देण्यास आमचा कोणताही विरोध नाही.मात्र हे करताना पेंडसे समितीचा अहवाल स्वीकारून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्य देऊन तेथील लोकांच्या पाण्याची गरज आधी पूर्ण करून कोयनेच्या अवजलातील उर्वरित पाणी मराठवाड्याला न्यावे अशी आपली मागणी आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना तर भेटणार आहोतच याशिवाय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन कोकणवासीयांच्या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button