सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तारकर्ली येथील समुद्रात पर्यटक तरुणाचा बुडून मृत्यू


मालवण तारकर्ली येथील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना सातारा येथील तिघे जण समुद्रात बुडाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ओंकार अजित शेलार (वय २४, रा.सातारा) व आकाश रामदास बेबले (वय २४ रा. सातारा) या दोघांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह समुद्र किनारी सापडून आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील ओंकार अजित शेलार, आकाश रामदास बेबले, रोशन जोतिराम फडतरे, प्रतीक शिवनाथ केंदळे, सुजित अनिल जाधव, ऋषिकेश दारासिंग वाघमोडे या सहा तरुणांचा ग्रुप मालवणात पर्यटनासाठी आला होता. वायरी येथील होम स्टे मध्ये ते वास्तव्यास होते.आज सकाळी हे तरुण तारकर्ली येथे समुद्री पर्यटनासाठी दाखल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण तारकर्ली एमटीडीसी केंद्रासमोरील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले. समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत असतानाच लाटेच्या तडाख्यात यातील ऋषिकेश वाघमोडे, ओंकार शेलार व आकाश बोबले हे तिघे पाण्यात बुडाले. यावेळी इतर तिघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्यावर असलेल्या ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक व मच्छिमार यांनी समुद्रात धाव घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्थानिकांनी ओंकार व आकाश या दोघांना समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले.

मात्र ऋषिकेश वाघमोडे हा समुद्रात बुडून बेपत्ता झाला. किनाऱ्यावर आणलेल्या ओंकार शेलार व आकाश बेबले या दोघांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. उपचारानंतर या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, तारकर्ली समुद्रात बेपत्ता झालेल्या ऋषिकेश वाघमोडे याचा स्थानिक ग्रामस्थांकडून समुद्रात शोध घेण्यात येत होता. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश वाघमोडे याचा मृतदेह तेथीलच समुद्रात सापडून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button