
128 वर्षांच्या योगगुरू बाबा शिवानंदांचे निधन.
21 मार्च 2022 रोजी राजधानीत 128 कर्तृत्त्ववान व्यक्तींना तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या कार्यक्रमात अनवाणी आणि साध्या कपड्यांमध्ये आलेल्या बाबा शिवानंदांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.त्यांनी वाकून राष्ट्रपती कोविंद यांना नमस्कार केला पण, राष्ट्रपतींनी वाकून त्यांना उठविले, हे विशेष! पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर, गुडघ्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करून आभार व्यक्त करणारे बाबा शिवानंद चर्चेचा विषय झाले. पंतप्रधान स्वत:ची खुर्ची सोडून उभे राहीले आणि बाबा शिवानंदांना वाकून नमस्कार केला. हे फोटो आणि व्हिडीओज व्हायरलही झाले होते. असे हे योगगुरू आणि 128 वर्षे वय असलेल्या बाबा शिवानंद यांचे शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. ते गेल्या 3 दिवसांपासून बीएचयुमध्ये उपचार घेत होते. वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.