
महाभारत म्हणजे भरत वर्षाचा इतिहास
डॉ. सुचेता परांजपे : ६९ व्या कालिदास व्याख्यनमालेस प्रारंभ
रत्नागिरी : “कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मन स्वच्छ ठेवून करावा. महाभारत वाचताना ते आपल्या हजारो वर्षांचा भरत वर्षाचा इतिहास आहे. तो इतिहास म्हणूनच समजून घेता आला पाहिजे. महाभारत अनादि असून त्यातील गोष्ट अत्यंत गुंतागुंतीची आहे,” असे प्रतिपादन पुण्यातील तज्ज्ञ वक्त्या डॉ. सुचेता परांजपे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेत “महाभारत समज- गैरसमज” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. परांजपे यांचा सन्मान केला. तर संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कालिदास व्याख्यानमालेचा समारोप दि ९ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. परांजपे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
कौरव-पांडव युद्ध, पांडवांचा वनवास, दुर्योधनाबाबतच्या काही घटना, श्रीकृष्णाची युद्धनिती, गीता अशा विविध गोष्टींबाबत डॉ. परांजपे यांनी मार्गदर्शन केले. हा सूर्य हा जयद्रथ, नरो वा कुंजरो वा, पुराणातली वानगी पुराणात अशी विधाने, सूतोवाच करणे, बकाबक जेवणे, असे मराठीत आपण वापरत असलेले अनेक शब्द हे महाभारत आपल्या रक्तात भिनले आहे याचे निदर्शक आहेत. संजयाला दिव्यदृष्टी नव्हती तर कुरक्षेत्रावर वार्तिक (वार्ताहर) होत. संजय हा योद्धा होता, पण त्याने धनुष्य होती घेतले नाही. युद्ध सुरू झाल्यावर चौथ्या दिवशी तो कुरुक्षेत्रावर आला व त्याने एका रथाचे सारथ्य केले होते, असे समजते.
त्या म्हणाल्या की, महाभारतामध्ये कौरव- पांडवांचे युद्ध हा मुख्य विषय आहे. हा विषय ज्यामध्ये वर्णिला गेला त्या ग्रंथाचे वर्णन करताना जय नावाचा इतिहास व्यासांनी लिहिला गेला असे मानले जाते. यामध्ये ८८०० श्लोकसंख्या होती. त्यानंतर २४००० श्लोकांचे भारत आणि १ लाख श्लोकांचे महाभारत अशा क्रमाने महाभारताची रचना झाल्याचे त्यांनी सांगितले. व्यासांनी महाभारत रचले असले तरी त्यात कालपरत्वे वृद्धी होत गेली आहे. डॉ. परांजपे यांनी आधुनिक काळात बी. आर. चोप्रा यांनी महाभारत मालिका केल्यामुळे महाभारत घराघरांत पोहोचले याची दखल घेतली.
भांडारकर संस्थेने केले संशोधन
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारताची चिकित्सक आवृत्ती (क्रिटिकल एडीशन) प्रकाशित केली. त्याकरिता अनेक वर्षे संशोधन कार्य सुरू होते. भारतासह अन्य देशांतील उपलब्ध १५०० हस्तलिखितांचा अभ्यास करण्यात आला. महाभारताबद्दल अनेक गैरसमजही समाजात आहेत. युद्धभूमीवर बाणांच्या शय्येवर (शरपंजरी) भीष्म होते. परंतु शर नावाचे अतिशय मऊ गवत असते. त्यावर ते झोपलेले असावेत. संस्कृतमध्ये एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात. त्यामुळे अभ्यास करताना त्याचा संदर्भ लक्षात घेऊन अर्थ लावावा लागतो. भांडारकर संस्थेत डॉ. एम. ए. मेहेंदळे यांच्या हाताखाली महाभारत समजून घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. साखळकर यांनी प्रास्ताविक केले. तर स्नेहा शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले व संस्कृतच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. या कार्यक्रमाला रत्नागिरीतील विद्यार्थी, संस्कृतप्रेमी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
द्रौपदीची थाळी
द्रौपदीची थाळी असा एक शब्दप्रयोग महाभारतातून आलेला आहे असे समजले जाते. या नावाने काही हॉटेल्सही आहेत. पांडव वनवासात गेले त्यावेळी त्यांच्यासोबत २ हजार विद्वान, पंडित, सेवक, सेविका वर्गही होता. त्यामुळे द्रौपदीला जेवण करण्याची किंवा भांडी घासण्याची आवश्यकता नव्हती. द्रौपदीची थाळी कधीही रिक्त राहत नाही, असे म्हटले जाते. वनवासाला गेल्यावर युधिष्ठिराने देवाची प्रार्थना केली, त्यावेळी सूर्यदेव प्रसन्न झाला व त्याने अक्षय पात्र दिले. त्यामुळे त्यांना वनवासाच्या काळात जेवण कमी पडले नाही. भरतवर्षाचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.




