
जलवाहतूक व जहाज बांधणी कारखाना जिल्ह्याच्या विकासासाठी क्रांतिकारी ठरेल. उद्योगांचे जाळे व रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगांचे जाळे वाढेल त्यातूनच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. दरडोई उत्पन्नातही भर पडेल व या जिल्ह्याच्या विकासाला बळ मिळेल. असा प्रयत्न राज्य व केंद्र सरकारने म्हणूनच जहाज बांधणी कारखाना व सागरी किनारपट्टीवरून जलवाहतूक हे दोन प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती देतील असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एक दिवसीय जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंत्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व्यवस्थापक रवींद्र पत्की यांच्यासह अन्य अधिकारी, गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकार जे चांगले काम करेल त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा असणार आहे. विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योघाकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे. त्यात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत देशातील उद्योजकांनी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातच गुंतवणूक करायची आहे, असे म्हटले पाहिजे, असे वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ मध्ये बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून प्रवास करत असताना नेमका कसा आकार घेतोय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज झालेले सामंजस्य करार, आज झालेली गुंतवणूक ही आमच्या जिल्ह्यासाठी निश्चित फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाला अजून मोठा करण्याचा मानस मी व्यक्त करतो. ही परिषद तीन चार दिवसांची भरावी. यावेळी किमान ५०० करार व्हावेत, असा आपला प्रयत्न आहे. आपल्या जिल्ह्याची प्रतिमा उद्योग जगामध्ये, गुंतवणूकदारांमध्ये उंचावायची आहे. का सिंधुदुर्गमध्ये तुम्ही गुंतवणूक करावं यासाठी असंख्य कारणे द्यायला लागतात. आम्ही आपल्या गुंतवणूकदारांसाठी, उद्योजकांसाठी नेमकं काय काय करू पाहतोय ? काय काय सुविधा आम्ही देत आहे ? कशा कशामध्ये आम्ही सवलत देतोय ? या सगळ्याचा पण एक प्रेझेंटेशन गुंतवणूकदारांच्या समोर झालं पाहिजे, अशा मतांचा मी आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करता म्हणजे खिशातले पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुंतवतो तर आपल्या कंपनीला नफा झाला पाहिजे आणि जिल्ह्याच्या तरुण-तरुणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या दुहेरी फायदा आम्ही पाहत आहोत. त्यासाठी पोषक वातावरण आम्ही निर्माण करणार आहोत, असे सांगितले. गेल्या आठवड्यात मोठ्या उद्योजकांच्या प्रतिनिधी मला भेटायला आले होते.
त्यांनी काही माहिती माझ्याकडून मागितली. त्यांनाही काही उद्योग उभे करायचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योजकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा म्हणून पुढे येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा अग्र क्रमांकावर राहिलाच पाहिजे अशा पद्धतीचं काम सुरू आहे. एअरपोर्टवर प्रामुख्याने आपण यासाठी लक्ष घालतोय. चांगले रस्ते, वीज चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जिओ आणि बी एस एन एल नेटवर्क उभरणिवर भर दिला आहे. एअरपोर्टमध्ये चार महिन्यांत नाईट लँडिंग ची सुविधा सुरू होते आहे. पुढील वर्षीच्या फिल्म फेअर अवॉर्ड, झी अवॉर्ड जिल्ह्यात घेण्यासाठी मी विनंती केली आहे. त्यांनी ती मान्य सुद्धा केली आहे. यामुळे जिल्ह्याचे सौंदर्य अधिक पसरून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत भर पडणार आहे, असे यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले.
आम्ही एक ‘सिंधुदुर्ग प्रथम’ अशी थीम तयार केली आहे. सिंधुदुर्गला प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर ठेवण्याचा यात निश्चय आहे. गुंतवणूक, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्र, कृषी क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग मोडला जाईल अशा पद्धतीचा काम पुढच्या पाच वर्षांमध्ये आमच्या माध्यमातून निश्चितपणे केले जाईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ मध्ये एकूण ३० उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यातील २२ जणांचे सामंजस्य करार आज झाले. त्यातील १७ जणांना करार पत्र मंत्री राणे यांच्याहस्ते देण्यात आले. एकूण ६३५ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.